आदिस्ते-सुतारकोंड येथे २० लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न; खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून कामांना सुरुवात

प्रदीप सोंडकर / शहर प्रतिनिधी महाड
आदिस्ते – सुतारकोंड: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सन २०२६-२७ च्या स्थानिक विकास निधीमधून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आदिस्ते – सुतारकोंड येथे उत्साहात संपन्न झाला. या विविध विकासकामांसाठी एकूण २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, स्वर्गीय आबासाहेब जगताप आणि कैलासवासी रावजी बुवा दवंडे यांचे अत्यंत घनिष्ठ व कौटुंबिक राजकीय संबंध होते. या जुन्या व जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधांमुळेच खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या संघटनात्मक कार्याचा आणि भागाच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाचा याप्रसंगी आदरपूर्वक गौरव करण्यात आला. त्यांच्याच प्रेरणेने आणि संघटनेच्या अविरत प्रयत्नांमुळे आज या विकासकामांना गती मिळाली आहे.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत मोतिराम जगताप, रायगड लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष व खाडी पट्टा ज्येष्ठ कार्यकर्ते विक्रम मालप आणि रिहाना देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमात गावचे सरपंच मारुती मौले, गावचे अध्यक्ष महेंद्र दवंडे, मंडळाचे अध्यक्ष सुरेश धाडवे, सल्लागार सुहास गोडांबे, गावचे ज्येष्ठ नागरिक नामदेव दवंडे व वामन पंदिरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच मुंबई मंडळाचे सदस्य दगडू रहाटवाल, विनायक तांबे, ज्ञानेश्वर मौले, विजय मौले, गावातील कामांसाठी नेहमी सक्रिय असणारे कार्यकर्ते मंगेश दवंडे व विनोद गोरीवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे आदिस्ते सुतारकोंड परिसराच्या पायाभूत विकासाला मोठी गती मिळणार आहे, असा दृढ विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिस्ते – सुतारकोंड महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले असून उपस्थितांचे आभार मानले.



