पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल; परिसरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रदीप सोडकर यांच्या कार्याचा नागरिकांकडून गौरव

योगेश कडू – महाड शहर
महाड : ‘ए एस मराठी न्यूज चॅनल’च्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट आणि निष्कलंक कार्य करणारे पत्रकार प्रदीप अनंत सोडकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सो. प्रभा सोडकर यांचा महाड-पोलादपूर परिसरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साही व आल्हाददायक वातावरणात सत्कार करण्यात आला.
महाड आणि पोलादपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व पत्रकारकीय कार्याची दखल घेऊन या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी महाडचे माजी तहसीलदार अनंत टमके, गजानन पालकर, लक्ष्मण चव्हाण, मोहिते, डॉ. देशमुख, डॉ. पवार आणि प्रदीप चिकलकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव:
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. प्रदीप सोडकर आणि सो. प्रभा सोडकर यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह भेट देऊन मोठ्या उत्साहात गौरवण्यात आले.
‘ए एस मराठी न्यूज चॅनल’च्या माध्यमातून जनसामान्यांच्या अडीअडचणींना व प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामाजिक जाणीव जपण्याचे मोलाचे कार्य श्री. प्रदीप सोडकर करीत आहेत. त्यांच्या या निष्कलंक व कर्तृत्ववान कार्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



