महाड येथे ‘राष्ट्रीय एकता रॅली’चे उत्साहात स्वागत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे जाणाऱ्या रॅलीला दाखवला हिरवा झेंडा

प्रदीप सोंडकर / शहर प्रतिनिधी महाड
महाड: कठीण आणि आव्हानात्मक काळात संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधून अखंड भारताची निर्मिती करणारे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान असीम व अविस्मरणीय आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय एकता रॅली’चे ऐतिहासिक महाड नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या विशेष सोहळ्यात रॅलीला पुढील प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
दक्षिण भारतातून सुरू झालेली ही भव्य एकता रॅली सुमारे दोन हजार किलोमीटरचा टप्पा पार करत गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे मार्गस्थ होत आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली, तरी देशाची अखंडता आणि एकात्मता जपण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी घेतलेले अपार कष्ट आपल्या सर्वांसाठी सदैव दीपस्तंभ ठरतील, असा सूर या प्रसंगी उमटला. तसेच सरदार पटेलांचे कर्तृत्व जगासमोर आणणारे हे भव्य स्मारक उभारल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
विविध राज्यांतील पोलीस अधिकारी, जवान आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या उत्साही उपस्थितीत, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या जयघोषात या रॅलीचा निरोप समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन जाणाऱ्या या सर्व सहभागी जवानांचा पुढील प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे, नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, भाजप नेते बिपिन म्हामुणकर यांच्यासह विविध राज्यांचे पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षकवृंद, शाळकरी विद्यार्थी आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



