शहर

दुष्काळग्रस्त श्रीवर्धनमध्ये लाखो लिटर पाणी खाडीत; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष!

गालसुरे नदीतील पाणी अडवून जिरवण्याची गरज; वारंवार निदर्शनास आणूनही उपाययोजना कागदावरच?

 

श्रीवर्धन : अनिकेत मोहित

श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित झाल्यानंतरही पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नसल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यात एकीकडे पाण्याची उपलब्धता आणि भविष्यातील टंचाई यांची चिंता व्यक्त होत असताना, दुसरीकडे गालसुरे गावाजवळील नदीतून दररोज लाखो लिटर पाणी वाहून थेट खाडीत जात असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध पाणी अडवून त्याचा साठा करण्यासाठी तातडीने प्रयत्न होणे आवश्यक असताना, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाचे अनियमित प्रमाण, घटणारी भूजलपातळी आणि पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेमुळे श्रीवर्धन तालुक्यात आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक जलस्रोतांचे योग्य नियोजन करून पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे ही काळाची गरज बनली आहे. गालसुरे गावाजवळून वाहणाऱ्या नदीतील पाणी खाडीत जाण्यापूर्वी त्याचा योग्य वापर करण्यासाठी बंधारे, पाणी अडविणाऱ्या संरचना तसेच आवश्यक जलसंधारणाची कामे हाती घेता येऊ शकतात. मात्र, यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची व्यवस्था करणे किंवा इतर तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी योग्य पद्धतीने अडविल्यास त्याचा उपयोग भूजलपातळी वाढविण्यासाठी, विहिरींची पाणीपातळी टिकवण्यासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी होऊ शकतो.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले असून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही हा विषय संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. मात्र, वारंवार माहिती देऊनही प्रत्यक्षात कोणती ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. जनहिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याची दखल घेतली जात नसेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्यांकडे प्रशासन कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करताना प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणे आवश्यक आहे. गालसुरे नदीच्या परिसराची तांत्रिक पाहणी करून पाणी अडविण्यासाठी योग्य उपाययोजना निश्चित कराव्यात, संबंधित विभागांनी समन्वय साधावा आणि जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.

एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाहून जात असताना त्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करायचे, हा विरोधाभास दूर होणार तरी कधी? श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर तरी प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य समजणार का, की पाणीटंचाई प्रत्यक्ष दारात उभी राहिल्यानंतरच उपाययोजनांना सुरुवात होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!