श्रावणी सोमवारनिमित्त शिवसेना शहर संघटनेतर्फे अंगणवाडीतील बालकांना खाऊवाटप

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर
श्रावणी सोमवारनिमित्त शिवसेना शहर संघटनेच्या वतीने श्रीवर्धन शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांसाठी खाऊवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, त्यांच्यासोबत काही वेळ आनंदाचे क्षण घालवणे आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सामाजिक उपक्रम पोहोचवणे या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
श्रावणी सोमवार हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून केवळ धार्मिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजातील चिमुकल्या बालकांसाठी आनंदाचा क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना शहर संघटनेने केला. अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. खाऊ मिळाल्यानंतर बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख शिवराज चाफेकर, महिला शहरप्रमुख प्रियांका कदम, युवासेना तालुका अधिकारी श्रीवर्धन निकेत कोसबे, युवासेना तालुका अधिकारी म्हसळा कौस्तुभ करडे, उपशहरप्रमुख भावेश पालेकर, शाखाप्रमुख प्रथमेश मदन, शाखाप्रमुख प्रशांत चोगले, महिला उपशहरप्रमुख तेजस्विनी कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी बालकांशी संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले.
श्रावणी सोमवारच्या धार्मिक वातावरणात चिमुकल्या बालकांसोबत आनंदाचा क्षण साजरा करत हा सामाजिक उपक्रम पार पडला. शिवसेना शहरप्रमुख शिवराज चाफेकर यांच्या माध्यमातून श्रीवर्धन शहरात सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, सामाजिक बांधिलकी जपत गरजू, सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी विविध उपक्रम घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सण-उत्सवांना सामाजिक उपक्रमांची जोड देत समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा आणि आपुलकीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जात आहे.
सामाजिक कार्य हे केवळ एखाद्या एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता सातत्याने समाजाच्या गरजा ओळखून उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. शिवराज चाफेकर यांच्या पुढाकारातून भविष्यातही श्रीवर्धन शहरात अशाच प्रकारचे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अंगणवाडीतील बालकांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पालक, अंगणवाडी सेविका तसेच उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.



