आसनपोई येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड : महाड तालुक्यातील आसनपोई येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दि. ३ ते ५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४६ वे वर्ष आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्यात कार्तिकी एकादशीला प्रथम सुरूवात होणारा हा हरिनाम सप्ताह असतो. सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वी कै. सद्गुरू वरंधकर बाबा यांनी या गावामध्ये विठ्ठल रूख्मिणीचे एकत्र मंदिर बांधले. या ठिकाणी इतिहास काळात देखील मंदिर अस्तित्वात होते याचे दाखले सापडतात. या गावातील तरूणांनी एकत्र येवून गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे एकत्र असे शिवशंभू स्मारक देखील उभे केले आहे. गावामध्ये ग्रामदेवता सोमजाई आणि कालकाई यांचेही मंदिर असून जागृत देवता म्हणून त्या ओळखल्या जातात.
पंचेचाळीस वर्षापूर्वी इगतपुरी येथील तपोनिधी गुरूवर्य कै. काशिनाथबाबा नाठे यांनी या हरिनाम सप्ताहाला सुरूवात केली. तेव्हापासून तो अखंडीतपणे सुरू आहे. अडीच दिवस चालणारा हा सप्ताह तालुक्यातील प्रथम सप्ताह असल्यामुळे या सप्ताहाला हजारो भाविक भेट देवून सप्ताहाचा आणि दर्शनाचा लाभ घेत असतात.
या सप्ताहानिमित्ताने, महापूजा, भजन, कीर्तन, हरिजागर, ज्ञानेश्वरी परायण, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे रोज आयोजन करण्यात आले आहे.
३ नोव्हेंबर रोजी प.पू. आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशी बाबा (बीड), ४ नोव्हेंबर रोजी सरस्वती भूषण भागवताचार्य ह.भ.प. चंद्रकांत वांजळे (पुणे,) आणि ह.भ.प. सागर महाराज बोरोटे (नातेपुतेत्र हे कीर्तनसेवा देणार असून, ५ नोव्हेंबर रोजी रायगड भूषण ह.भ.प. नारायण महाराज वाडकर हे काल्याचे कीर्तन करणार आहेत.
५ नोव्हेंबर रोजी पालखी सोहोळ्यानंतर महाप्रसादाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.



