श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई, दोन जण ताब्यात

श्रीवर्धन शहर अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य व सुगंधित पानमसाला पदार्थांच्या विक्रीविरोधात श्रीवर्धन पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि त्यासाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण १ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन एसटी स्टँड परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या डिकीमध्ये गुटखा, तंबाखू आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा लपवून ठेवला जात होता आणि त्याची गुप्तपणे विक्री केली जात होती. या माहितीनुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत मोठा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मेहेरबानो समीर टोळेकर आणि सचिन सहदेव रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान विविध कंपन्यांच्या सुगंधित पानमसाल्याची पाकिटे, तंबाखू, सुगंधित तंबाखूची पाकिटे तसेच इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादने जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात पानमसाल्याच्या विविध प्रकारच्या पाकिटांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रायगड आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी रजि. नं. १५७/२०२५ अन्वये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA), २००३ चे कलम ७(२)(अ)(ब), ८ आणि २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. वाहनाच्या डिकीचा वापर करून गुप्तपणे गुटख्याची विक्री केली जात असल्याचा उलगडा झाल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात पुढेही कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा श्रीवर्धन पोलिसांनी दिला आहे.



