महाड न.पा. शाळा क्रमांक दोनमध्ये स्वच्छता गृह हवे – मनसेची मागणी
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड: दि.13 महाड नगर पालिका शाळा क्रमांक दोनमध्ये स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केली आहे.
या मागणीचे एक निवेदन चव्हाण यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना दिले. या शाळेमध्ये शाळा क्रमांक २ बरोबरच शाळा क्रमांक १ चे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग देखील भरतात. या शाळेमध्ये स्वच्छतागृह नसल्याने शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर विद्यार्थ्यांना करावा लागतो. त्या परिसरात वाढलेले गवत आणि कमालीच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब विचारात घेता शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे चव्हाण यांनी केली आहे.
या शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ही सुविधा देखील तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.



