तालुका

अखेर नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर उघडले देवाचे दार

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतले पाली येथील श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचे दर्शन

राजू शेख – तालुका प्रतिनिधी पाली

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून धार्मिक स्थळांचे दरवाजे सर्व भाविकांसाठी बंद झाली होती. मात्र कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर शासनाने दिलेल्या अटी नियमांचे पालन करीत आजपासून धार्मिक स्थळांची दारे अखेर उघडण्यात आली आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी सुधागड पाली येथील सुप्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आजपासून भाविकांसाठी धार्मिक स्थळे उघडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले व समस्त भाविकांच्या वतीने शासनाचे आभार मानले.

याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्री बल्लाळेश्वराला साकडे घातले की, रायगडच्या जनतेवरील सर्व संकटे दूर करावीत. गेल्यादीड वर्षांपासून रायगडची जनता आणि एकूणच कोकण भागातील जनता ही विविध संकटांना तोंड देत आहे, मात्र आता सर्व जनतानव्याने आयुष्याला सुरुवात करीत आहे. त्यांना बळ दे आणि सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण कर.

त्याचबरोबर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जनतेलाही आवाहन केले आहे की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जनतेने अजून ही जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे, तापसदृष्य कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे, या बाबी कटाक्षाने पाळाव्यात.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही प्रमाणात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना परवानगी दिली आहे. मात्र गरबा व तत्सम कार्यक्रमास परवानगी नाही. हा निर्णय जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या हिताचा असून करोनाचे संकट पूर्णपणे गेल्यानंतर पुढीलवर्षी अधिक उत्साहाने, श्रद्धेने नवरात्र उत्सव साजरा करुया, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथील श्री महाकाली मंदिरात देवीचे दर्शन घेतले व सर्वांना नवरात्रोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, श्रीमती गीताताई पालरेचा, तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, पोलीस निरीक्षक विजय तायडे, सरपंच ॲड. श्री.धारप, श्री क्षेत्र बल्लाळेश्वर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!