ब्रेकिंग

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन; बस सेवा विस्कळीत, मुंबईकरांना मनस्ताप

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा 

 

बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या वेट लिज बसच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. बेस्टच्या सांताक्रूझ आगारात शनिवारी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज जोगेश्वरीतील मजास आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. समान काम-समान दाम, बोनस व इतर मुद्यांवर हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना अपुऱ्या बस सेवेमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासून जोगेश्वरी येथील मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. पगार, बोनस आणि समान काम समान मोबदला आदी मागण्या या आगारामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रदेखील दिले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे. या आंदोलनाची धग इतर आगारातही पोहचण्याची शक्यता आहे.  प्रतीक्षा नगर आणि धारावी आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. रविवारी सुट्टी असली तरी दिवाळी सणासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मागील काही महिन्यांपासून बेस्ट प्रशासनाने नियुक्त केलेल्या वेट लिज बसच्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. सातत्याने होणाऱ्या आंदोलनामुळे बेस्टची बस वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी बेस्ट प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!