पिठोरी गौरी पूजनाने श्रीवर्धन परिसर दुमदुमला
पारंपरिक पूजा, भजन आणि आरतीने वातावरण भक्तिमय; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर
पिठोरी अमावस्येनिमित्त श्रीवर्धन शहरासह परिसरातील घराघरांत पिठोरी गौरीचे पूजन पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले. गौरीची आकर्षक सजावट, विधिवत पूजा, नैवेद्य, आरती आणि भजनांच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पिठोरी अमावस्येला हिंदू धर्मपरंपरेत विशेष महत्त्व असून, संततीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी या दिवशी गौरीचे पूजन करण्याची प्रथा आहे. विशेषतः महिलांकडून श्रद्धेने ही पूजा केली जाते. आपल्या कुटुंबाचे सुख-शांती आणि मुलांच्या कल्याणासाठी गौरी मातेकडे प्रार्थना करत ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.
श्रीवर्धनमध्ये सकाळपासूनच महिलांची पूजेची लगबग सुरू होती. घराघरांत फुले, रांगोळी आणि विविध पूजासाहित्याने सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने गौरीची स्थापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. पूजेनंतर झालेल्या आरती तसेच भजनांच्या कार्यक्रमांनी धार्मिक वातावरणात आणखी रंग भरला. भजनांच्या सुरांनी आणि आरतीच्या जयघोषाने परिसर भारावून गेला.
या उत्सवात महिलांसह लहान मुले आणि कुटुंबातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बदलत्या काळातही श्रीवर्धन परिसरात पारंपरिक सण-उत्सवांची संस्कृती जपली जात असल्याचे या निमित्ताने दिसून आले. नव्या पिढीला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी, यासाठी अनेक कुटुंबांनी मुलांनाही पूजेच्या विधींमध्ये सहभागी करून घेतले.
भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचा सुरेख संगम घडविणाऱ्या पिठोरी गौरी पूजनामुळे श्रीवर्धन परिसराला जणू भक्तीमय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.



