पावसाळयात तसेच अतिवृष्टीच्या इशारा कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव वरंध घाटातील वाहतूक बंदी अधिसूचना जारी
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
कोकण विभागात मान्सूनमध्ये पडणारा पाऊस व सन 2021-22 च्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापूराची परिस्थिती पाहता हा महामार्ग पावसाळयामध्ये जड वाहनांसाठी बंद करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या घाटामधील अवघड वळणमार्गावर काम करण्यासाठी वरंध घाट काही कालावधीसाठी बंद करणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे. त्यानुसार या महामार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आय. एम.डी.च्या अतिवृष्टीच्या इशारा कालावधीत देखील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी महामार्ग वाहतूकीसाठी बंद करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. या बंद कालावधीमध्ये पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगाव-निजामपूर- ताम्हाणी घाट- मुळशी-पिरंगुट पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड- चिपळूण-पाटण कराड-कोल्हापूर असा पर्याय सूचविण्यात आला आहे.
यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दि. 7 जुलै 2023 या दिनांकापासून ते दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी किमी 73/00 (मौजे वरंध) ते किमी 81/600 ( रायगड जिल्हा हद्द ) वरंध घाटातील रस्ता अवजड वाहतुकीकरिता व आय.एम.डी.च्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केले आहेत.



