छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
कोण कोण या बंदमध्ये सहभागी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. आज सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुक मोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.



