ब्रेकिंग

महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना

पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भारतातील उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

या प्रसंगी रतन टाटा यांचे शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह तसेच २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांच्या बोलताना सांगितले.

तसेच महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार रविवार दि.२० ऑगस्ट या वेळी समारंभपूर्वक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहेत. तसेच या वेळी ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरूप १५ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र, ”उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!