महाड : कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकट काळात सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर शासनाच्या मर्यादा होत्या, दहिहंडी हा उत्सव देखील त्याला अपवाद नव्हता, मात्र आता या उत्सवावर असलेले सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने महाडकरांना या वर्षी दहिहंडीचा थरारअनुभवता येणार आहे.
महाड शहरासह तालुक्यात दहिहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, महाड शहरात सर्वाधिक ६५ सार्वजनिक तर ७९ खाजगी हंड्या बांधण्यात येतात, महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ सार्वजनिक तर ९० खाजगी आणि महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४६ सार्वजनिक तर ७० खाजगी दहिहंडी बांधण्यात येतात.
सर्वाधिक दहिहंडी महाड शहरात बांधण्यात येत असल्याने महाड शहरात या उत्सवाचा आनंद अपूर्व असतो, यावर्षी आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळा तर्फे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक असलेली हंडी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गोविंदा पथकांना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. चार थर लावून सलामी देणाऱ्या पुरुष गोविंदा पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपये, पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना सात हजार रुपये, सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना १० हजार रुपये तर तीन थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकांना चार हजार रुपये, चार थर लावून सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकांना सात हजार रुपये आणि पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना दहा हजार रुपये अशी रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येणार आहे.
महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे गेल्या १८ वर्षा पासून दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी देखील मंडळाने या उत्सवाचे आयोजन केले आहे, मनसे तर्फे देखील लायन्स क्लब महाड येथे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.
महाड मध्ये ठीक ठिकाणी दहीहंडी सरावला सुरुवात झाली असून महाड मधील पाहिलं मानच दहीहंडी पथक कोटेश्वरी क्रीडा मंडळाने पहिल्याच दिवशी यशस्वी 5 थर लावले असून या आधी महाड मध्ये सर्व प्रथम 7 थर लावण्याचा मान देखीलया मंडळा ला मिळाला आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा सराव करून बाहेर हंडी फोडायला जाणार आहेत, पुरुष व महिला असे २पथक असणार आहेत.
महाड मधील दहिहंडी फोडण्यासाठी केवळ महाड शहर किंवा तालुक्यातीलच नव्हे तर मुंबई, ठाणे, पेण, रोहा, माणगांव, खेड अशा ठिकाणांची गोविदा पथकेही येत असल्याने दोन वर्षानंतर दहिहंडीचा हा थरार अनुभवण्यास महाडकर उत्सुक आहेत.



