महाड मध्ये दुर्गामाता दौड नऊ दिवस प्रत्येक विभागातून जयघोषात होणार
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड: दी. १५ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाड रायगड विभाग यांच्यावतीने एक दशकाहुन अधिक वर्ष सुरु असलेली ही महाड तालुक्यातील एकमेव दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला ३ ते ४ जणांच्या समुहाने सुरु केलेली दुर्गादौड आज शेकडोंच्या संख्येने शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नवरात्रौत्सव काळात दहा दिवस महाड शहरातून दुर्गामाता दौड करण्यात येणार आहे, दररोज सूर्यादयाच्या वेळेस महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या दौडीला प्रारंभ झाला आहे.
पहिल्या दिवशी श्री कोटेश्वरी देवी (विरेश्वर मंदिर), दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी मंदिर काकरतळे, तिसऱ्या दिवशी महिकावती देवी भोई घाट, चौथ्या दिवशी कोटेश्वरी देवी कोटेश्वरीतळे, पाचव्या दिवशी सुंदरवाडी येथील दुर्गामाता, सहाव्या दिवशी काजळपुरा येथील आई भवानी, सातव्या दिवशी जरी मरी अंबीका माता काकरतळे, आठव्या दिवशी कालिका माता मंदिर तांबट आळी, नवव्या दिवशी नवेनगर येथील जगदंबा आणि दहाव्या म्हणजेच दर्गामाता महादौडीच्या दिवशी ही दौड महाड शहराची ग्रामदैवत असलेल्या आई जाकेमातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे.
तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार रुजावेत आणि राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने या दौडीचे आयोजन करण्यात येते. प्रारंभीच्या काळात चार ते पाच तरुणांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या या दौडीत आता शेकडो तरुण सहभागी होतात.
या दुर्गामाता दौडीत विविध देशभक्तीपर गीते, गोंधळ आणि देव देवतांच्या जयघोषात रोज शहरातील प्रत्येक भागातुन पादाक्रांत होते. ही दुर्गादौड ज्या भागातुन जाते त्या भागातील महिला आणि ज्येष्ठ मंडळी आपल्या दारासमोर रांगोळी काढून तसेच दौडवर पुष्प वर्षाव करुन या दौडमध्ये शिवप्रभुंचा द्योतक असणाऱ्या भगव्या ध्वजाची मनोभावे आरती करुन स्वागत करतात. फक्त महाडच नाही तर संपुर्ण हिंदुस्थानात ज्या ज्या ठिकाणी सूर्य उगवतो त्या-त्या प्रत्येक वाडी, वस्तीवरती दुर्गामाता दौड ही मोठ्या जोमाने साजरी व्हावी हेच आपले कर्तव्य आहे.



