शहर

घोडे व्यावसायिकांची मुजोरी; नगरपालिकेकडून लवकरच कडक दंडात्मक कारवाई!

काही घोड्यांचे नंबरिंग पूर्ण, संपर्क न करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेचा कडक बडगा

 

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर

श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते, पर्यटन स्थळे आणि चौपाट्यांवर मोकाट घोड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येची नगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. पालिकेच्या आवाहनाला न जुमानता नियम धाब्यावर बसवणाऱ्या घोडे व्यावसायिकांच्या मुजोरीला आता लगाम घातला जाणार असून, पालिकेकडून लवकरच कडक दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य राखण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून वॉकिंग ट्रॅक व सिमेंटचे रस्ते तयार केले आहेत. मात्र, या ठिकाणी काही व्यावसायिक आपले घोडे मोकळे सोडून देत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेने घोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना नंबरिंग (नोंदणी क्रमांक) देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अनेक जबाबदार घोडे व्यावसायिकांनी आपल्या घोड्यांची नोंदणी करून नंबरिंग करून घेतले आहे. मात्र, काही व्यावसायिक अद्यापही पालिकेकडे संपर्क साधत नसल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत आणि नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका आता कोणतीही मूकसंमती न देता थेट कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मोकाट घोड्यांच्या अचानक धावण्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाने केवळ नोटिसा न काढता आता थेट ऑन-फील्ड कारवाईचे नियोजन केले आहे.

पालिकेचे आगामी पाऊल:

नियम मोडणाऱ्या घोडे मालकांवर जागेवरच मोठा आर्थिक दंड ठोकणार.

पर्यटन स्थळांवर पालिकेच्या पथकाकडून अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार.

“नगरपालिकेकडून काही घोड्यांना नंबरिंग करण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, काही घोडे व्यावसायिक अद्यापही नगरपालिकेकडे संपर्क करत नसल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत नसून, पालिकेच्या आवाहनाला न जुमानणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा सर्व घोडे मालकांवर लवकरच कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.”

— श्री. अनंत गुरव (आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!