गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी श्रीवर्धनच्या मुख्य रस्त्यावरील धोकादायक खचलेले भाग दुरुस्त करा!
आराठी–जसवली मार्गावर मोरीच्या ठिकाणी रस्ता खचला; दुचाकीस्वारांच्या जीविताला धोका, अनेकजण पडल्याची माहिती

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता असतानाच आराठी ते जसवलीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर निर्माण झालेला धोकादायक खचलेला भाग वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यावर मोरीचे काम करण्यात आले होते. मात्र या ठिकाणाहून होणाऱ्या अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ता खचल्याचे दिसून येत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा भाग अपघाताचा सापळा बनला आहे.
रस्त्यावरील खचलेला भाग दुचाकीवरून प्रवास करताना वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून पडल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा समोरून वाहन येत असताना हा खचलेला भाग लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या समस्येकडे गेल्या महिन्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावेळी संबंधित विभागाकडून लवकरच या ठिकाणची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असून या काळात श्रीवर्धनकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. बाहेरील पर्यटक, गणेशभक्त, स्थानिक नागरिक तसेच अवजड वाहने यांची मोठी रहदारी या मार्गावर राहणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील हा धोकादायक भाग वेळेत दुरुस्त न केल्यास एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ आश्वासन न देता तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी. तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांना धोक्याची जाणीव व्हावी यासाठी तात्पुरते सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवातील वाढती वाहतूक लक्षात घेता ही बाब आता केवळ रस्त्याच्या दुरुस्तीपुरती मर्यादित राहिलेली नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.
अपघात होण्याची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



