तालुका

सोमनाथ ओझर्डे यांचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन संभाजी पाठारे हेच आमचे अध्यक्ष राहणार एमएमए सदस्यांचा निर्धार

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड दि. 9 शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे हे संभाजी पाठारे यांचा राजीनामा मागणारे कोण? असा सवाल करीत महाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थातच एमएमएच्या सर्व सदस्यांनी संभाजी पाठारे हेच आमचे अध्यक्ष राहतील असा निर्धार व्यक्त केला आणि सोमनाथ ओझर्डे यांचे सर्व आरोप हे बिनबुडाचे व तथ्यहीन असून वैयक्तिक अकसापोटी केले असल्याचा दावा एमएमएच्या वतीने बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी एमएमए कॉन्फरन्स हॉल येथील आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

एमआयडीसी उपअभियंता बोबडे यांची बदली ही पाठारे यांनी केली नसून बोबडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कारखानदारांना धमकावणे, बेकायदेशीर पत्र देणे अशा पद्धतीच्या तक्रारी आल्याने आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या त्या पद्धतीच्या पार्श्वभूमीमुळेच झालेली असून यामध्ये पाठारे यांचा हात असल्याचा दावा म्हणजे निव्वळ वैयक्तिक अकसापोटी बदनामी करण्या हेतूने करण्यात आलेला होता आणि तो अधिकारी ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होता तेथे देखील त्याच्या विरोधात अशा अनेक तक्रारी येत असल्याची माहिती देऊन तळोजा एमआयडीसी येथील त्यांच्या विरोधातील तक्रारीचे एक पत्रच सर्व पत्रकारांना यावेळी दाखविण्यात आले.

ज्या सीईटीपी युनिट आणि पाठारे यांची राज्यपातळीवर त्याचप्रमाणे देशपातळीवर दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांचा राजीनामा मागणे हेच मूर्खपणाचे आहे असे व्हाईस चेअरमन अशोक तलाठी यांनी याप्रसंगी सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की

दहा वर्षांपूर्वी महाड एमआयडीसीतील प्रदूषणाची स्थिती काय होती हे सर्वांनाच ज्ञात आहे त्यावेळी अनेक कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे बंद पडत होत्या कारण कोणतीही कंपनी त्यांच्या निकषानुसार आपले सांडपाणी सोडत नव्हती.

दहा वर्षापूर्वी कंपन्यांचा इनलेट सीओडी 5000 ते 7000 होता तो आता सलग 6 ते 7 वर्ष 600ते 900 एवढाच येत असून आउटलेट पूर्वी 1000 ते 1500 होता तो आता फक्त 200 ते 300 च्या दरम्यान येत आहे.

संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत जे अजूनही अविरत चालू आहेत त्यामध्ये सर्वसामान्यांसाठी माफक दरामध्ये 24 तास सुविधा असणारे हॉस्पिटल चालू केले असून एक वैद्यकीय मोबाईल व्हॅन गावोगावी फिरून मोफत वैद्यकीय सुविधा देत असते, गोरगरीब जनतेसाठी डायलिसिस सेंटर चालू केलेले असून त्यामध्ये फक्त दोनशे रुपयामध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध आहे. जवळजवळ दीडशेहून अधिक जिल्हा परिषद शाळा डिजिटल स्वरूपात आम्ही पूर्ण केल्या आहेत.

कोरोना काळात पाच कोटी रुपयांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले होते व त्यात सर्व कोविड रुग्णांना मोफत उपचार दिले गेले. एकेकाळी अत्यंत डर्टीथर्टी अशा स्वरूपाची समजली जाणारी ही महाड एमआयडीसी पाठारे यांच्या कार्यकाळात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत प्रभावी काम करीत आहे आणि यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीने पर्यावरणाचा व सामाजिक बांधिलकीचा समतोल राखत काम करणार असून अशा बिनबुडाच्या आरोप करणाऱ्या लोकांना आमच्या कामानेच उत्तर मिळेल आणि अशी बेताल मानहानीकारक व्यक्तव्य केल्या प्रकरणी सोमनाथ ओझर्डे यांच्यावर आम्ही याआधी सुद्धा मानहानी दावा केला असून आत्ताच्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या आरोपावरून पुन्हा नव्याने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे एम एम ए असोसिएशनच्या वतीने अशोक तलाठी यांनी सांगितले.

महाडच्या खाडीपट्ट्यातील लोकांना प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा या हेतूने पूर्वी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या संघर्ष समितीतर्फे विराज पाटील, मंगेश गिरी इत्यादी प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा पूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती यावर भाष्य करताना पाठारे यांचे भरभरून कौतुक केले तसेच साहेबांनी आमच्या समस्या जाणून आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केले आणि आमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न केला आणि त्याचेच परिणामाने आज खाडेपट्ट्यात प्रदूषणाची समस्या कमी झाली आहे. त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे अशी आमची भावना आहे .जे कोणी आरोप करत आहेत ते व्यक्तिगत आणि बदनामी पोटी करत आहेत. अशा आरोपांवर लक्ष देऊ नये आणि यापुढेही आम्हाला आपले असेच सहकार्य मिळावे अशी विनंती संघर्ष समितीने श्री पाठारे यांच्याजवळ केली आणि पत्रकार परिषदेस त्यांना बोलवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या पत्रकार परिषदेस तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, एमएमए अधिकारी व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!