महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष! प्रभागातील रस्ते उखडले, गटारे तुंबली; स्थानिक नगरसेवक अन् प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

प्रदीप सोंडकर महाड शहर
महाड: महाड नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये नागरी समस्यांचा डोंगर साचला असून, स्थानिक नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची दुरवस्था यांमुळे रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे. तक्रारी करूनही पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उखडलेले रस्ते अन् अपघातांना निमंत्रण
प्रभागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील खडी बाहेर आली आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्यांवरून चालणे किंवा वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना या खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात घडले असूनही नगरपालिका प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
गटारांची दुर्दशा; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रभागात सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधलेली गटारे गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरली आहेत. गटारांची नियमित साफसफाई न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहताना दिसत आहे. यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, डेंग्यू, हिवताप आणि इतर साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.



