जिल्हयातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव सेंटर, भजी आणि भेळ विक्रेते ईत्यादी व्यावसायिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
अभिजीत ढाणिपकर - शहर प्रतिनिधी महाड
अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्नपदार्थ गुंडाळून / बांधून ग्राहकांना देण्याची प्रथा सर्रास दिसून येते. परंतु वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल/घातक रंग असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे.
त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र किंवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. विशेषत: वयोवृध्द व लहान मुलांसाठी हे जास्त धोकादायक आहे. जिल्हयातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव सेंटर, भजी आणि भेळ विक्रेते ईत्यादी व्यावसायिकांनी यापुढे अन्न पदार्थ ग्राहकांना देण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन रायगड-पेण लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.



