रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९२ रक्तपिशव्यांचे संकलन
‘रायगड मी मराठी प्रतिष्ठान’च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

अनिकेत मोहित / श्रीवर्धन प्रतिनिधी
‘रायगड मी मराठी प्रतिष्ठान’च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (४) मुंबई गोरेगाव पश्चिम येथील आय. बी. पटेल शाळेत झालेल्या या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिरातून तब्बल १९२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनसेवेचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यंदाच्या वर्धापनदिनानिमित्त मोठा सत्कार समारंभ अथवा मनोरंजनाचा कार्यक्रम न घेता ‘रक्तदान करा… जीवनदान द्या!’ हा सामाजिक संदेश देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील रक्तदात्यांनी सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत या उपक्रमात योगदान दिले. १९२ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने शिबिराचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले.
‘वसा संस्कृतीचा… ध्यास जनसेवेचा’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानने वर्धापनदिनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाला प्राधान्य दिल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रक्तदान करणाऱ्या दात्यांचे तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.
रक्तदानातून वर्धापनदिनाचा सामाजिक संदेश
वर्धापनदिनाचा खर्च केवळ उत्सवावर न करता रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला. त्यामुळे आठव्या वर्धापनदिनाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून, १९२ रक्तपिशव्यांचे संकलन हा या उपक्रमाचा विशेष ठरला.



