शहर

श्रीवर्धनचे संतोष यवतकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

अनिकेत मोहित / शहर प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन : आविष्कार फाऊंडेशन सामाजिक संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने श्रीवर्धन येथील शिक्षक संतोष यवतकर यांचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

पेण येथील आगरी समाज सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत संतोष यवतकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक संजय पवार, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण, अर्थ व क्रीडा विभागाचे सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील, ॲड. सूर्यकांत कडाकणे, सूरज उद्योग समूह मुंबईचे चेअरमन, गजाननराव जाधव, मितेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. मुंबईचे चेअरमन, आविष्कार फाऊंडेशनचे कोकण विभाग अध्यक्ष संदीप नागे, रायगड कार्याध्यक्ष किशोर मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संतोष यवतकर यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल २५ वर्षे सेवा बजावली आहे. कुलकर्णी विद्यालय, बोर्लीपंचतन यासह दिघी, कुडगाव, वडघर, निगडी कोंड, गालसुरे आदी ठिकाणी त्यांनी शैक्षणिक सेवा बजावली आहे. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गालसुरे (मराठी) येथे कार्यरत आहेत.

 

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना अदानी फाऊंडेशनचा तालुकास्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र आदर्श शिक्षक समितीचा जिल्हास्तरीय पुरस्कार तसेच निपुण भारत अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.

 

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष यवतकर यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे गालसुरे परिसरासह श्रीवर्धन तालुका आणि रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातही अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!