आरोग्य व शिक्षण

जिल्हा रुग्णालयात युरोलॉजी, ओरल कॅन्सर व इंटरवेंशनल रेडिओलॉजीच्या उपचाराना सुरुवात

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि. 25 जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे रुग्णाना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत अशा सेवांकरीता सामंजस्य कराराद्वारे अतिविशेषतज्ञांच्या सहकार्याने युरोलॉजी (मूत्रविकार), ओरल कॅन्सर (मुख कर्करोग) व इंटरवेंशनल रेडिओलॉजीच्या संदर्भातील रुग्णाना बाह्य रूग्ण विभागात मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.

मूत्रविकारसंदर्भातील (युरोलॉजी) हायपोस्पाडिअस, अंडकोषसंदर्भातील तपासणी, किडनी व मूत्रसंदर्भातील आजार, लहान बालके व मोठ्यामध्ये मूत्रमार्गसंदर्भात वारंवार होणारे संसर्ग असे आजार असणाऱ्या रुग्णांकरीता मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी अलिबागमधील प्रसिद्ध मूत्रशल्यचिकित्सक डॉ. दशरथ घुगे (M.B.B.S. M.S. DNB Urology) हे आठवड्यातील दर गुरुवारी दुपारी २.०० वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपिडी क्रमांक ०८ येथे सेवा देणार आहेत. तर पायातील रक्तवाहिनी संदर्भातिल आजार, वृक्कविकारशास्त्र, न भरणारी जखम, स्तन, फुफुसातील जखमासंदर्भात बायोप्सी व तपासणी तसेच यकृत, हातापायातील रक्तवाहिनी, मेंदूतील रक्तस्त्राव व स्ट्रोक संदर्भातील तपासणी करण्यासाठी डॉ. अक्षय गुरसाळे, रक्तवाहिनी शल्यचिकित्सक हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी दुपारी २.०० वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपिडी क्रमांक ०३ येथे सेवा देणार आहेत.

तसेच मुख कर्करोग संबंधित तपासणी व उपचार तसेच मुख कर्करोग पूर्व होणारे आजार जसे की, पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड न उघडणे, तोंडातील न भरणारी जखम, मुख कर्करोग निदान व शस्त्रक्रिया, जबड्याचे फ्रॅक्चर, अपघातग्रस्त रुग्णांच्या जबड्यावरील तसेच जबड्यातील गाठीची उपचारशस्त्रक्रिया व खालच्या जबड्याचे जॉइन्ट संबंधित आजारवर निदान व उपचार करण्यासाठी रायगडमधील प्रसिद्ध मुख कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सौजन्य सुहास साईकर हे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी १०.०० वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपिडी क्रमांक १५ येथे सेवा देणार आहेत.तरी वरील सर्व आजारासंदर्भात निगडीत रुग्णानी या मोफत उपचार व सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगडमधील सर्व जनतेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी- घुगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!