महाराष्ट्र

२००८ मधील हिंसाचार प्रकरणातील राज ठाकरें विरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. २००८ मध्ये हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल राज ठाकरे यांच्याविरुद्धचा खटला मुंबई हायकोर्टाने रद्द केला. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबतच्या रेकॉर्डवरील साहित्याचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने त्यांच्यावरील हिंसाचार भडकवण्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात भडकावण्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत हायकोर्टाने राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.

२००८ मध्ये म्हणजे १६ वर्षे जुन्या याप्रकरणावर आज सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज ठाकरे यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. हे प्रकरण २१ ऑक्टोबर २००८ चे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन बसवर दगडफेक करण्यात आली होती. हिंसाचाराला प्रोत्साहन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यभर हिंसचार झाला होता. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर करमाळावरून तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली होती. त्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!