आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या ‘कृषिपंढरी व तृण धान्य’ महोत्सवाचे उदघाट्न संपन्न
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या ‘कृषिपंढरी व तृण धान्य’ महोत्सवाचे उदघाट्न मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी काळ्या आईची सेवा करून नाविन्यपूर्ण पद्धतीने पिकवलेली पिके आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मला मिळाली असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.
वारीच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात शेती उत्पादनाच्या विविध जाती प्रजाती पहायला मिळाल्या. या प्रदर्शनात फिरताना एका तरुण शेतकऱ्याने ५ एकरात तब्बल १.२० कोटी रुपयांचे आल्याचे उत्पादन घेतलेले पाहिले त्यामुळे मनात आणले तर शेतकरी काहीही करू शकतो. पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसेच शासनाने बळीराजासाठी अनेक निर्णय घेतले यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणे असो, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे राज्य शासनही प्रतिवर्षी सहा हजार रूपये देण्याचा निर्णय असो, किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीला मदत करणे असे अनेक निर्णय घेतले आहेत.
पंढरपूरात हे प्रदर्शन वारीनिमित्त भरवण्याला एक वेगळे महत्त्व आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकून आपले शेतशिवार फुलवावे, तसे झाल्यासच राज्यातील शेतकरी सुखी संपन्न होईल असे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरतशेठ गोगावले, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारीनिमित्त आलेले हजारो शेतकरी उपस्थित होते.



