जिल्हा

गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रशासन सज्ज

अपघाताच्या प्रसंगी तातडीच्या वैद्यकीय मदतीची व्यवस्था

 

प्रदीप सोंडकर / शहर महाड 

रायगड दि.१२: गणेशोत्सवाच्या काळात मुंबई – गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. प्रवासादरम्यान लहान-मोठे अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास गणेशभक्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात 10 ठिकाणी कर्नाळा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर (मोहोप्रा ब्रीज), पनाडेवाडी आणि धामणदेवी-कशेडी घाट येथे सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या सुविधा केंद्रांवर गणेशभक्तांसाठी पोलीस मदत केंद्र, आरोग्य केंद्र,वाहन दुरुस्ती कक्ष, वैद्यकीय कक्ष, बालक आहार कक्ष, महिलांसाठी फिडींग कक्ष तसेच मोफत चहा, बिस्कीट आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावरून एकूण 5 वैद्यकीय पथके सुसज्ज रुग्णवाहिकांसह 24 x 7 तास सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालय, पनवेल; उपजिल्हा रुग्णालय, पेण; जिल्हा रुग्णालय, माणगाव; ग्रामीण रुग्णालय, महाड आणि ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.

गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा, यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, गणेशभक्तांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!