मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक, टोलनाक्या प्रकरणी मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई
मुंबईसह राज्यभरात मनसैनिक आक्रमक
नेहा चांदोरकर – शहर प्रतिनिधी मुंबई
मुंबई : टोलनाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यभरात सध्या टोलनाक्या मुद्द्यावर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी राज्यभर टोलनाक्यांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवार 9 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मनसैनिक देखील आक्रमक होऊ लागले. मनसैनिकांनी टोल नाक्यावर टोल नाक्यावर उभं राहत चार चाकी वाहनं अशीच सोडली. त्यानंतर या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोलनाक्यावरुन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अटक केल्यानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया मला अटक करण्यात आली आहे. मला मेडिकलला घेऊन जात आहेत. माझ्यासह 12 जणांना अटक केलीये. आमची धरपकड करण्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी जे म्हटलय, त्याचे जर पालन झाले तर धरपकड करण्याची गरज नाही’, अशी अविनाश जाधव यांनी अटकेनंतर प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर असलेल्या शेडूंग टोल नाका येथे आंदोलन सुरु केलं. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले.



