दादली पूल येथील साई लीला पान शॉपमध्ये विमल गुटखा आढळला; पोलिसांकडून साठा ताब्यात
गांजा विक्रीच्या आरोपांचीही चर्चा; शाळा व ITI कॉलेज परिसरातील प्रकारामुळे प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

प्रदीप सोंडकर / शहर महाड प्रतिनिधी
महाड तालुक्यातील दादली पूल परिसरातील साई लीला पान शॉपमध्ये 18 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजता विमल गुटखा आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पानशॉपमध्ये गुटखा आढळल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतला. शाळा आणि ITI कॉलेजच्या जवळच हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पानशॉपमधील गुटखा ताब्यात घेतला. मात्र, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत किती आहे? या प्रकरणात पंचनामा करण्यात आला आहे का? तसेच संबंधित पानशॉपचालकाविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, साई लीला पान शॉपमधून गांजाची विक्री केली जात असल्याचा आरोपही काहींकडून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
तसेच पानशॉपला संबंधित प्रशासनाची अधिकृत परवानगी आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



