ब्रेकिंग

सलग सुट्ट्यांमुळे श्रीवर्धन हाऊसफुल!

समुद्रकिनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी; रिसॉर्ट, हॉटेल व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद

 

अनिकेत मोहित / शहर प्रतिनिधी श्रीवर्धन

 

श्रीवर्धन : २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीची सुट्टी आणि त्यानंतर आलेल्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबई, पुणे तसेच रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक श्रीवर्धनकडे दाखल झाल्याने शहरासह समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे श्रीवर्धन ‘हाऊसफुल’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

श्रीवर्धनच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत असून सकाळपासूनच समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढली. समुद्राच्या लाटांचा आनंद घेत, समुद्रकिनाऱ्यावर फिरत आणि कुटुंबीयांसोबत पर्यटनाचा आनंद लुटताना पर्यटक दिसून आले. अनेक पर्यटकांनी श्रीवर्धनच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाला पसंती दिली आहे.

 

गांधी जयंतीची सुट्टी आणि त्याला जोडून शनिवार-रविवारची सुट्टी आल्याने अनेकांनी कुटुंबीयांसह छोट्या सहलीचे नियोजन केले. यासाठी श्रीवर्धनला पसंती देत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. त्यामुळे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांसह समुद्रकिनारे दिवसभर गजबजलेले दिसून आले.

 

पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा थेट फायदा स्थानिक पर्यटन व्यवसायाला झाला आहे. शहरातील रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंग तसेच खानावळींमध्ये मोठी गर्दी असून अनेक ठिकाणी निवासाची मागणी वाढली आहे. स्थानिक खाद्यपदार्थ आणि समुद्री खाद्यपदार्थांचाही पर्यटकांकडून आस्वाद घेतला जात आहे. त्यामुळे हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिकांसह स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

श्रीवर्धनसोबतच हरिहरेश्वर, दिवेआगर, बागमंडला परिसरातही पर्यटकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. सलग सुट्ट्यांमुळे संपूर्ण परिसराला पर्यटनाचे स्वरूप आले असून, श्रीवर्धन पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत असल्याचे चित्र आहे.

 

सलग सुट्ट्यांचा पर्यटन व्यवसायाला हातभार

 

गांधी जयंतीपासून सुरू झालेल्या सलग सुट्ट्यांमुळे श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता हॉटेल, रिसॉर्ट, खानावळी आणि इतर स्थानिक व्यवसायांमध्येही चांगली उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी सुट्ट्यांच्या काळातही श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!