मुंबई येथे टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ शुभारंभ सोहळा संपन्न
अभिजीत ढाणिपकर – शहर प्रतिनिधी महाड
मुंबई : आशियातील सर्वात नामांकित मॅरेथॉन स्पर्धा अशी ओळख असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यंदा १५ जानेवारी २०२३ रोजीपार पडणार आहे. या स्पर्धेची सदस्य नोंदणी कार्यक्रमाची घोषणा आज करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे या स्पर्धेचे आयोजन करता येणे शक्य झाले नसले तरीही यंदा मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यासमयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली. या स्पर्धेत देश परदेशातील अनेक सुप्रसिद्ध धावपटू तसेच सामाजिक संस्था, सेलिब्रिटी तसेच इतर विविध खेळांतील नामांकित खेळाडू यांचाही या स्पर्धेत सक्रिय सहभाग असतो. यावेळी देखील ५० हजाराहून जास्त स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज असल्याने त्यांचे अतिशय नेटके आयोजन करता येईल असे यासमयी त्याच्या बोलण्यातून दिसून आले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी.माधवन, एफआयचे अध्यक्ष आदिल सुमरीवाला, वेस्टर्न नेव्हल कमांडट कृष्ण स्वामिनाथन, बीसीसीएलचे अध्यक्ष शिवकुमार सुंदरम, टाटा मोटर्सचे मार्केटींग हेड विवेक श्रीवास्तव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
