श्रीवर्धनच्या गतिरोधकांवर पट्टेच नाहीत; अपघाताची वाट पाहताय का?
मुख्य रस्त्यावरील गतिरोधक धोकादायक; फलक व पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव — सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

श्रीवर्धन प्रतिनिधी – अनिकेत मोहित
श्रीवर्धन मधील मुख्य रस्त्यांसह विविध मार्गांवर उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे (मार्किंग) नसल्याने वाहनचालकांसाठी हे गतिरोधक धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधक असल्याची कोणतीही पूर्वसूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी हे गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गांभीर्याने लक्ष देणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
श्रीवर्धन शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी गतिरोधक आहेत. मात्र त्यावर आवश्यक असलेले पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर किंवा गतिरोधकाची स्पष्ट सूचना देणारे फलक अनेक ठिकाणी दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अचानक गतिरोधकाचा सामना करावा लागतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे, कमी दृश्यमानता आणि रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश यामुळे धोका आणखी वाढतो.
नागरिकांकडून एखादी समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वारंवार निवेदने दिली जातात. पत्रकारितेच्या माध्यमातूनही विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते. मात्र तक्रार झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याऐवजी प्रशासनाकडून केवळ तक्रारींची नोंद घेण्यापुरतीच कार्यवाही होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
यापूर्वीही आराठी ते जसवली मार्गावरील मोरी खचल्याची बाब नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यानंतरही त्यावर अपेक्षित कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्यांची पाहणी, धोकादायक ठिकाणांची नोंद आणि आवश्यक ती दुरुस्ती ही प्रशासनाची नियमित जबाबदारी असताना प्रत्येक बाबीसाठी नागरिकांनी किंवा पत्रकारांनी प्रशासनाला जागे करण्याची वेळ का यावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित अधिकारी आणि कर्मचारीदेखील याच रस्त्यांचा नियमित वापर करतात. त्यामुळे रस्त्यावरील गतिरोधक, खचलेले भाग, अपुऱ्या सूचना किंवा इतर धोकादायक ठिकाणे त्यांच्या निदर्शनास येत नाहीत का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाला समस्या दिसत नाहीत की त्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच संभाव्य धोके दूर करणे आवश्यक आहे. गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारणे, आवश्यक ठिकाणी परावर्तित (रिफ्लेक्टर) पट्टे लावणे, गतिरोधकाचे सूचना फलक उभारणे तसेच शहर व परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
श्रीवर्धनमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आता केवळ तक्रारींची वाट न पाहता स्वतःहून रस्त्यांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या समस्येची सार्वजनिक बांधकाम विभाग कधी दखल घेणार आणि प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार, याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.



