मोबाईल सोडून चिमुकल्यांच्या हातात रंग आणि माती; गालसुरे-काठीमध्ये कलागुणांना मिळाली चालना

श्रीवर्धन प्रतिनिधी – अनिकेत मोहित
श्रीवर्धन: गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून संस्कार, कला आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने गालसुरे-काठी गावात गालसुरे काठी मुंबई मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी चित्रकला आणि मूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला गावातील चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक मुलाने आपल्या कल्पनेनुसार चित्र रेखाटण्याचा तसेच मातीपासून मूर्ती साकारण्याचा मनापासून प्रयत्न केला. कोणाची चित्रकलेतून कल्पनाशक्ती दिसून आली, तर कोणाच्या हातून साकारलेल्या मातीच्या मूर्तीमध्ये कलाकौशल्याची झलक पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, आजच्या मोबाईलच्या युगात बहुतांश वेळ मोबाईलमध्ये रमणारी मुले या उपक्रमामुळे रंग, कागद आणि मातीशी जोडली गेली. मातीपासून मूर्ती घडविताना तसेच चित्र रेखाटताना मुलांना वेळेचे भानच राहिले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आपल्या हातून काहीतरी साकारल्याचा आनंद पालकांसह उपस्थितांसाठीही कौतुकाचा विषय ठरला.
स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या मुलांना गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
लहान वयात मुलांच्या अंगी असलेली कला आणि सर्जनशीलता ओळखून त्यांना योग्य संधी देणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशील विचारांना चालना मिळते. त्यामुळे गालसुरे काठी मुंबई मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविलेल्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.
गालसुरे काठी मुंबई मंडळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच चिमुकल्यांच्या कलागुणांना नवी दिशा मिळाल्याचे चित्र गालसुरे-काठी येथे पाहायला मिळत आहे



