शेवगावमधील व्यापाऱ्यांचा दगडफेकीविरोधात बेमुदत बंद; मुख्य आरोपीचा शोध लागेपर्यंत बंदचा निर्णय
शेवगावमध्ये शांतता राखण्याचे आवाहन
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक
शेवगाव : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. पोलिसांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली असून व्यापारी आणि ग्रामस्थ बेमुदत बंदवर ठाम आहेत. जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ग्रामस्थांना आरोपींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यामुळे शेवगाव शहरात शांतता पसरली आहे.
शेवगाव येथे सध्या तणावपूर्ण शांतता असून शहरातील प्रमुख ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार असून शहरातील सामाजिक शांतता कायम राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील दिडशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला असून 31 जणांना ताब्यात घेतले आहे.



