
अनिकेत मोहित / शहर प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीवर्धन तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला असून, तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वातावरणातील उष्णता वाढल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे.
सकाळच्या वेळेत वातावरण काहीसे आल्हाददायक असले तरी सूर्य वर येताच तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या सुमारास सूर्याची किरणे तीव्र जाणवत असून, शहरासह ग्रामीण भागातही उन्हाचा चटका जाणवत आहे. समुद्रकिनारी असलेल्या श्रीवर्धन परिसरात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमानाने ३६ अंशांचा टप्पा गाठल्याने बदलत्या हवामानाची प्रचिती येत आहे.
पावसाळा संपल्यानंतर वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरींचे वातावरण असताना आता सूर्यप्रकाश वाढल्याने तापमानातही वाढ झाली आहे.
दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान ३६ अंशांवर पोहोचल्याने आगामी दिवसांत तापमानाचा पारा आणखी किती वाढतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



