नवी मुंबई उलवे येथे श्री. तिरुमला तिरुपती देवस्थान श्री. व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन संपन्न
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
श्री. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने नवी मुंबईतील उलवे येथे नव्याने तयार करण्यात येत असलेल्या श्री. व्यंकटेश्वराच्या मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा अतिशय पवित्र वातावरणात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
या भूमिपूजन सोहळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा सोहळा म्हणजे सर्वांना आनंद देणारा सोहळा असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. प्रत्येकाला तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन अध्यात्मिक अनुभूती घेण्याची इच्छा असते मात्र सगळ्यांनाच प्रत्यक्ष जायला मिळते असे नाही अशा वेळी सर्वसामान्य लोकांना आता या महाराष्ट्राच्या भूमीत येऊन तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे ही आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात हे मंदिर उभे करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तिरुमला ट्रस्टचे आभार मानले. तसेच या ट्रस्टला राज्य शासनाकडून लागेल ती मदत करायला आपण तयार असल्याचे या प्रसंगी स्पष्ट केले. या पवित्र कामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सगळ्यांचे आभार यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, तिरुमला ट्रस्टचे सदस्य मिलिंद नार्वेकर, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेश बालदी, उद्योगपती गौतम सिंघनिया, तिरुमला ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी तसेच तिरुमला ट्रस्टचे इतर सर्व पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
