सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
धुळे : तालुक्यातील निमगूळ परिसरात अवकाळी पावसाने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेला गहू, बाजरी, लिंबू व टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यात देखील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले पीक देखील हिरावलं गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व या नुकसानीची पाहणी करावी. तसेच लवकरच नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाला संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना करून शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.



