जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला मान्सून-2023 पूर्वतयारीचा आढावा
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत मान्सून-2023 पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे दि. 25 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी हा आढावा घेतला.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांनी प्रास्ताविक करताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीची थोडक्यात माहिती दिली. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन, त्याबाबतची पूर्वतयारी, आवश्यक उपाययोजना, रायगड जिल्ह्याची भौगोलिक रचना, हवामान, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना “दरडी कोसळण्याची कारणे व प्रतिबंधक उपाय” या विषयावर “न्यूटन जागवा..दरडी थोपवा” पुस्तकाचे लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड व महाड तहसिलदार सुरेश काशिद यांनी महाड शहरात आलेल्या पूरपरिस्थितीत तसेच तळीये येथील दरड कोसळल्यानंतरच्या परिस्थितीत प्रशासनाने कशा प्रकारे काम केले, त्यावेळी काय अडचणी उद्भवल्या, भविष्यात त्या अडचणींवर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली.



