जिल्हा

शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी पूर्ण, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून कामाची पाहणी

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि 4 जानेवारी रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देवून तयारीची पाहणी केली.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यासपीठ, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शि‍बिर स्थळ, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली.

पालकमंत्री म्हणाले राज्यात प्रथम क्रमांकाचा हा कार्यक्रम होईल, अशी जय्यत तयारी सर्वांनी केली आहे. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी ओ. आर. एस, पाणी, नाश्ता, जेवण याकडे विशेष लक्ष द्यावे. लाभार्थी कार्यक्रमस्थळी येताना त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषत: वयोवृध्द लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी यांची विशेष काळजी घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे व पोलीस अधीक्षक श्री. घार्गे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!