तालुका

सोमनाथ ओझर्डे यांची अशीही गणेशभक्ती / दीड हजार चाकरमान्यांना दिली मोफत बस सेवा


सचिन
विजय चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 2 सप्टेंबर 2022 एस.टी. ची अपुऱ्या फेऱ्या, चार चार महिने आधीच फुल झालेले आरक्षण आणि खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूट अशा परिस्थितीत गणेशोत्सवासाठी आपले गाव कसे गाठायचे या विवंचनेत असणाऱ्या चाकरमान्यांना शिरगांवचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी मुंबई आणि परिसरातून मोफत आपल्या गावी पोहोचविले आहे. 36 बसेसद्वारे तब्बल दीडहजार चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घेत आपले गाव गाठले. माणसातच देव पाहून अशीही गणेश सेवा करणाऱ्या सोमनाथ ओझर्डे यांचेसंपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

मुंबई, ठाणे, पुणे परिसरात नोकरी, उद्योग, व्यवसाया निमित्त वास्तव्यास असणारे चाकरमाने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी मोठ्यासंख्येने येत असतात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळ गणपती स्पेशल बसेस, रेल्वे सोडत असते. मात्र याफेऱ्यांची संख्या आणि चाकरमान्यांची संख्या याचा ताळमेळ कधीच बसत नाही. चार चार महिने आधीच आरक्षण संपते. त्यामुळे असंख्य चाकरमान्यांना खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागतो. हे खाजगी बस चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन चाकरमान्यांना अक्षरशः लुटतात.

            गावी जावून गणेशाच्या स्वागतासाठी आतूर असणाऱ्या या चाकरमान्यांसाठी यावर्षी शिरगावचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ओझर्डे धावून आले. महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघातील चाकरमान्यांना ही मोफत बससेवा देण्याचा सोमनाथ ओझर्डे यांचा मानस होता. मात्र आपण ही सेवा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महाड तालुक्यासह पोलादपूर आणि माणगांव तालुक्यातील चाकरमान्यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधत आम्हाला गावी जाण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगत आम्हाला ही या सेवेचा लाभ देण्याची विनंती केली. सोमनाथ ओझर्डे यांनी त्यांची ही विनंती मान्य करित त्यांनाही ही मोफत बस सेवा दिली.

           करंजाडी जिल्हा परिषद गटातील १ हजार तिनशे तर या तीन तालुक्यांतील सुमारे ३०० असे दीड हजार चाकरमाने सोमनाथ ओझर्डे यांच्या या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी पोहोचू शकले. प्रवासादरम्यान या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होणारनाही , त्यांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी सोमनाथ ओझर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. विशेष म्हणजे ही मोफत बससेवा देण्यासाठी सोमनाथ ओझर्डे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्याच बसेस वापरल्या. ह्या सर्व बस शिरगांव नाक्यावर पोहचल्यानंतर स्वतः सोमनाथ ओझरडे आपल्या मित्र परिवारा सोबत चाकरमान्यांचे स्वागत करण्या साठी हजर होते. आलेल्या सर्वांना ओझर्डेयांच्या कडून मास्क, आरती चे पुस्तक, प्रसाद आदी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

सोमनाथ ओझर्डे यांनी गणेश भक्तांप्रती दाखविलेल्या या आपुलकीचे कौतुक होत आहे.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे होणारे हाल आपण अनुभवले आहेत. या चाकरमान्यांसाठी बसेसची मोफत व्यवस्था करण्याचे भाग्य मला लाभले. गणेश भक्तांची आपल्या हातून झालेली ही सेवा गणेशसेवाच असल्याचे मी मानतो.

–सोमनाथ ओझर्डे

चार चार महिने आधीच एस.टी. आरक्षण फुल झाले होते. खाजगी बसचा प्रवास परवडणारा नव्हता. सोमनाथ ओझर्डे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोफत बससेवेमुळे यावर्षी गणेशोत्सवाला गावी येता आले. त्यांचे आभार मानू तेवढे कमीच – विवेंद्र गोलांबडे, चाकरमानी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!