डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला सहकार्य राहिल – आमदार भरतशेठ गोगावले
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड दि. 26 डॉ. बाबसाहेब आंबेडकर महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज या महाविद्यालयात बोलताना दिली.
सन 2021 मध्ये महाडला आलेल्या महापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. कार्यालयीन दप्तरा बरोबर रसायन शास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणक शास्त्र त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेच्या प्रयोगशाळा त्या पुरात पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. त्यापैकी संगणक प्रयोगशाळेचे सकाळ रिलीफ फंडातून पुनर्निर्माण करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेचा शुभारंभ आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेजूळ, उपप्राचार्य प्रा. कडलग, प्रा. सोनार, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, बंधू तरडे, निखिल शिंदे, सिद्धेश पाटेकर, सुनील कोरपे, सकाळचे प्रतिनिधी सुनील पाटकर आदि उपस्थित होते.
या प्रयोग शाळेचे उदघाटन केल्यानंतर आयोजित करण्यातम आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना, आ. गोगावले यांनी या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक चांगली सुविधा मिळालेली असल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागाकडून या महाविद्यालयाला निधी मंजूर झाला आहे, पण तो अद्याप प्राप्त झालेला नाही, तो मिळवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे भूसंपादनाचा मोबदला लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.
प्राचार्य शेजूळ यांनी आपल्या मनोगतात, या महाविद्यालयात 11वी 12वी मध्ये दीड हजार तर वरिष्ठ महाविद्यालयात अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. महापुरामध्ये महाविद्यालयाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून उध्वस्त झालेल्या संगणक प्रयोगशाळेला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आल्याने ही प्रयेागशाळा नव्याने उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले. दानशूर नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे या महाविद्यालयात नव्याने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतअसल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. चव्हाण यांनी केले.



