तालुका

वीरेश्वर महाराजांची बहिण – देवी कोटेश्वरी


सचिन
चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड शहरामध्ये ज्या देवतांचा वास आहे, त्यामध्ये देवी कोटेश्वरी ही एक महत्वाची देवता आहे. महाडचे ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर महाराजांच्या भगिनींचा मान ज्या देवतांना दिला जातो, त्यापैकी एक देवी कोटेश्वरी विशेष म्हणजे या देवीची महाडमध्ये दोन मंदिरेआहेत. एक कोटेश्वरी तळे येथे तर दुसरे वीरेश्वर मंदिराच्या आवारात, कोटेश्वरी तळे येथे या देवीचे मुख्य स्थान आहे.

         छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोतनीसांकडे महाडची वतनदारी होती. महाराजांनी पोतनीस यांना कोटेश्वरी तळे येथे जमिन बक्षीस दिली होती. या जागेत देवीचा वास असल्याचा साक्षात्कार पोतनिसांना झाला. त्यांनी या जागेची सफाई केल्यानंतर एक अखंड पाषाण त्यांना आढळला. हा पाषाण म्हणजेच अमूर्त स्वरुपातील देवी कोटेश्वरी.

           या ठिकाणी मंदिर बांधायचे असेल तर एका रात्रीत आणि निगडीच्या लाकडांचा वापर करूनच ते बांधावे असा कौल देवीने दिला होता. ते शक्य नसल्याने येथे मंदिर बांधण्यात आलेले नाही. सुमारे साडे तिनशे वर्ष ही देवी खुल्या आकाशा खालीच होती. आठ दहा वर्षा पूर्वीकोटेश्वरी तळे ग्रामस्थांनी पुन्हा कौल मागितला. देवीने कौल दिल्या नंतर या ठिकाणी लोकसहभागातून छोटेसे घुमटाकार मंदिर बांधण्यात आले आहे. हा कौल मधुकर मोरे यांनी लावला होता. देवीने डावा आणि उजवा असे दोन्ही कौल दिले होते.

           महाडचे ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवात या कोटेश्वरी देवीला महत्व आहे. आपली बहिण जाखमाता हिलाबरोबर घेवून कोटेश्वरी छबिनोत्सवात आपल्या भावाला पालखीतून वाजत गाजत भेटायला जाते. जोपर्यंत जाखमातेचा आखाडा वीरेश्वर मंदिरात येत नाही तोपर्यंत मंदिराच्या प्रांगणातून कोटेश्वरी देवीचा आखाडा हलविला जात नाही. विन्हेर्‍याची ग्रामदेवता देवी झोलाईचे आगमन मोदरान कोटेश्वरी देवीचा गोंधळ झाल्यानंतरच छबिनोत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.

         नवरात्रात या मंदिर परिसरात रोषणाई करण्यात येते. महाड मधील महिला वर्ग कोटेश्वरीची ओटी भरुन सौभाग्य, सुखाची कामना करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!