वक्तृत्व स्पर्धेत वि. गो. लिमये विद्यामंदिरचे घवघवीत यश
उन्नवी पिळणकर प्रथम, देविका अडुळकर द्वितीय; दिवेआगरच्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अनिकेत मोहित / श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुका ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिवेआगर येथील वि. गो. लिमये विद्यामंदिराने उल्लेखनीय यश संपादन केले. विविध वयोगटांत विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर करत आपल्या वक्तृत्वकौशल्याची छाप पाडली.
इयत्ता ६ वी ते ८ वी या गटात कु. उन्नवी अनिकेत पिळणकर हिने प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी या गटात कु. देविका अमोल अडुळकर हिने द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. दोन्ही विद्यार्थिनींच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, विचार मांडण्याची क्षमता आणि व्यासपीठावर प्रभावीपणे सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विद्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.



