शहर

शिस्तीसोबत माणुसकी जपणाऱ्या व्यवस्थापकाला निरोप; श्रीवर्धन आगारात भावुक वातावरण

आगार व्यवस्थापक महेबूब मन्यार यांची सिंधुदुर्ग विभागात बदली

 

अनिकेत मोहित / शहर प्रतिनिधी श्रीवर्धन

 

श्रीवर्धन : रायगड विभागातून सिंधुदुर्ग विभागात बदली झालेल्या आगार व्यवस्थापक महेबूब मन्यार यांना आगारातील अधिकारी, चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 

महेबूब मन्यार यांनी आगाराचा कारभार सांभाळताना प्रशासकीय शिस्तीसोबतच कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याला प्राधान्य दिले. चालक, वाहक तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामातील अडचणी जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला.

 

कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुका समजून घेत त्यामागील परिस्थिती जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती कर्मचाऱ्यांना भावली. प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच कर्मचाऱ्यांशी माणुसकीने वागत त्यांनी त्यांना मानसिक पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले.

 

मन्यार यांच्या बदलीमुळे आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. सरकारी सेवेत बदली हा सेवेचा एक भाग असला तरी कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याला निरोप देताना वातावरण भावुक झाले.

 

यावेळी मन्यार यांच्या पुढील सेवेसाठी उत्तम आरोग्य, उज्ज्वल भवितव्य आणि नवीन जबाबदारीत यश मिळावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात पदोन्नती मिळून पुन्हा रायगड विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!