मुंबईत वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. मध्यरात्री मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेले आहेत.
मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर मरोळमध्येही जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळं मरोळमध्ये बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले. मुंबई एअपोर्ट परिसरात देखील वादळी पाऊस झाला.
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 13 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गीरपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



