सरकार पडणार या निव्वळ अफवा; राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्याने हे सरकार अधिक मजबूत झालं आहे, अजित पवारांच्या येण्यामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तर सरकार पडणार या केवळ अफवा असून माझ्या मागे मोदी-शाहांची ताकद असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरुन राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सोबत घ्यायचं ठरवलं. गेल्या वर्षभरात झालेल्या विकासाला पाहून अजित पवार सोबत आले आहेत. अजित पवार सोबत आल्याने सरकार मजबूत झाले असून शिवसेनेत कुणीही नाराज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत.



