कृषीवार्ता

टोमॅटो पोहोचले प्रतिकिलो दीडशे पार

अभिजीत ढाणिपकर - सहसंपादक 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक 

राज्यातील सत्ताकारण जोरात सुरू असतानाच सामान्य माणूस मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघतो आहे. तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे भावाने महागाईचा शिखर गाठल आहे. आजमितीला नाशिकच्या बाजारात टोमॅटोसाठी तब्बल 160 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोथिंबीर जुडीसाठी थोडेथोडके नव्हे तर चांगले 40 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून काही शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रासह विविध राज्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका टोमॅटोसह इतर भाज्यांना बसला आहे. राज्यासह देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून पाच आणि दहा रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आज जवळपास 150 ते 160 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरू असलेल्या पावसाचा टोमॅटोसह इतर भाज्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, टोमॅटोसह भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून घरचं बजेट कोलमडून गेलं आहे. पण या वाढीव दराचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का? हाच खरा प्रश्न आहे.

यंदाच्या चालू वर्षी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात टोमॅटो लागवड केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली होती. त्यामुळे टोमॅटोला उठाव नसल्याकारणाने प्रति किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत होते. प्रति किलोला एक दीड रुपया बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला होता. तर काही भागातील शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडली होती. अनेक ठिकाणी दराबाबत आंदोलने देखील करण्यात अली होती. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने टोमॅटो बाजार चांगलेच तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत टोमॅटो प्रति किलो 120 रुपयांपासून ते 160 रुपये दराने विक्री होत आहे. तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर टोमॅटो मालाला वर्षातील सर्वाधिक उच्चांकी बाजार मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!