आरोग्य व शिक्षण

श्रीवर्धन तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुर्दशा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

 

श्रीवर्धन शहर प्रतिनिधी- अनिकेत मोहित

श्रीवर्धन तहसील कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, शासकीय कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महसूल, कृषी आणि दुय्यम निबंधक यांसारखी महत्त्वाची कार्यालये असलेल्या या प्रशासकीय भवनमध्ये दररोज तालुक्यातील शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, नागरिकांसाठी असलेल्या मूलभूत सुविधांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्वच्छतागृहांमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा, घाण आणि अस्वच्छता साचलेली दिसून येत असून नियमित साफसफाई होत नसल्याची स्थिती आहे. स्वच्छता राखण्याचे संदेश देणारे फलक भिंतींवर लावलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेचा अभाव दिसत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तहसील कार्यालय हे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. विविध दाखले, महसुली कामे, जमिनीशी संबंधित व्यवहार, निवडणूक प्रक्रिया तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना येथे वारंवार यावे लागते. अशा ठिकाणी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांची ही अवस्था प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या खर्चाने स्वच्छतागृहांची साफसफाई करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला होता. मात्र, त्यानंतरही संबंधित शासकीय यंत्रणेकडून नियमित स्वच्छता व्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पावसाळ्याच्या काळात अशा अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छतागृहांची साफसफाई आणि नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“स्वच्छतेचे संदेश फलकांवर आणि घाणीचे वास्तव शासकीय कार्यालयात” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. आता तहसील प्रशासन यावर त्वरित कारवाई करून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!