जिल्हा

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक संपन्न

अभिजीत ढाणिपकर 

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेतले.

यात प्रामुख्याने पुण्यात जास्त गणेशोत्सव मंडळे असल्याने विसर्जन मिरवणूक लांबल्यास मंडळावर गुन्हे दाखल करू नयेत, गणेशोत्सवात गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतेही निर्बंध नसतील, तसेच गणेशोत्सव मंडळाना पालिकेकडे भरावे लागणारे शुक्ल माफ करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळांना मिळणाऱ्या परवानग्या सिंगल विंडो सिस्टीम किंवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतील, गणेशोत्सवा दरम्यान मंडळाच्या आवारात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करू नये असे निर्देश पुणे पोलिसांनी दिले आहेत.

गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी पोलीस परवानगी घ्यावी लागते त्याऐवजी पाच वर्षांची एकत्रितपणे परवानगी द्यावी असे निर्देश दिले, गणेशोत्सव मिरवणूक काढताना ढोल ताशांचा वापर करावा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ढोल वाजवले जाऊ नये असे स्पष्ट केले, गणेशोत्सव मंडळांचे लाईट मीटरचे प्रश्न, तसेच धर्मादाय आयुक्तांकडून मिळणाऱ्या परवानग्या सुलभपणे मिळाव्यात त्यासाठी खेटे मारावे लागू नयेत यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कायद्याच्या चौकटीत राहून मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळांना केले असून त्यांनी देखील त्याची तयारी दर्शवली आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पुणे शहरातील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!