ब्रेकिंग

महाड MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना त्वरित ३० लाखांची मदत कंपनी प्रशासनाकडून सुपूर्द

आणखी १५ लक्ष असे एकूण ४५ लक्ष भेटणार / ब्लु जेट कंपनी दुर्घटना मृतांची ओळख पटली, चोचिंदे येथील स्व. आदित्य मोरे यांचे वारसांना कंपनीकडून ३० लाखाचा धनादेश गोगावले यांच्या हस्ते केला सुपूर्द

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : महाड औद्योगिक वसाहती मधील ब्लु जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डिएनए चाचणीच्या तपासणीनंतर ओळख पटली असून या ११ कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. महाड तालुक्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदित्य मोरे यांचे निवासस्थानी जाऊन त्याचे वारसांकडे कंपनी प्रशासनाकडून देण्यात आलेला धनादेश महाडचे तहसिलदार महेश शितोळे, आमदार भरतशेठ गोगावले यांचे प्रतिनिधी विकास गोगावले, फॅक्टरी इस्पेक्टर केशव केंद्रे, डिवायएसपी शंकर काळे यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लु जेट कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ कामगारांचा मृत्यू व ७ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर दिवस रात्र कंपनीत तळ ठोकून असलेले आ. भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी कंपनी प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ त्याच बरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी ५ लाख, विमा कंपनी मार्फत ५ ते ९ लाख मदत देण्यात येईल असे आश्वासन देत धीर देण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व ११कामगारांची डिएनए चाचणीच्या तपासणी नंतर ओळख पटल्यानंतर आज त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे, खरवली येथील संजय पवार आणि तळीये येथील अक्षय सुतार यांचे पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी चोचिंदे येथील आदित्य मोरे यांचे वडील यांना कंपनी प्रशासनाकडून दिलेला ३० लाखाचा धनादेश तहसिलदार महेश शितोळे, डिवायएसपी शंकर काळे, आ. भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र शिवसेना राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, महाड शहर पोलिस ठाणे पो.नि. खोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, युवा सेनेचे महाड तालुका प्रमुख रोहीदास( पप्या)अंबावले, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी विकास गोगावले यांनी मृत आदित्य मोरे यांच्या वडीलांचे सांत्वन करताना गेलेला जीवाची किंमत आपण पैशाने भरून काढू शकत नाही मात्र कंपनी प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि विमा कंपनीकडून जास्तीत जास्त मदत आ. गोगावले व सर्व शासकिय अधिकार्‍यांच्या सहकार्याने मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.

फॅक्टरी इस्पेक्टर केंद्रे यांनी कंपनी मार्फत देण्यात आलेल्या ३० लाखाच्या मदती खेरीज विमा कंपनी कडून मिळणारी मदत आणि वारसा पैकी एकाला शैक्षणिक पात्रता पाहून कायम सेवेत सामावून घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी डिवायएसपी काळे यांनी वारसांना शासकिय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी आपल्या कार्यालयाकडून सर्वातोपरी मदत केली जाईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!